साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा आपण सगळे अगदी उत्साहात साजरा करतो. घर सजावट, नवीन कपडे, नवीन वस्तूंची खरेदी, जेवणाचा बेत ह्या सगळ्यांना प्रामुख्याने महत्त्व देतो. पण त्यामागची धार्मिक पार्श्वभूमी काय आहे हे दिवसेंदिवस विसरत चाललोय. ब्रह्मदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले असे पुराणात सांगितले जाते. गुढीपाडव्याच्या परंपरेला प्रामुख्याने तीन घटना कारणीभूत आहेत.
एक अशी कि ह्या दिवशी भगवान श्रीविष्णूंनी प्रभू रामचंद्रांचा अवतार घेऊन रावणासह राक्षसांचा पराभव केला. रावणाला ठार मारलं. त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी जनतेने गुढ्या-तोरणं उभारून त्यांचं स्वागत केलं. तेव्हापासून दर चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढ्या-तोरणं उभारून आनंदाचा विजयोत्सव दिन साजरा होऊ लागला.
दुसऱ्या एका कथनांन्वये वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजेंन्द्र झाला. स्वर्गातल्या अमरेंद्राने याच तिथीला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.
तिसऱ्या कथेप्रमाणे शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून त्यांच्या जाचातून जनतेची मुक्तता केली. या विजयाप्रित्यर्थ पाडव्याच्या तिथीपासून शालिवाहन शकाला प्रारंभ झाला. ज्यांनी विजय मिळवला तो ‘शालिवाहन’ आणि ज्यांच्यावर विजय मिळविला ते ‘शक’ असा दोघांचाही अंतर्भाव ‘शालिवाहन शक’ यामध्ये करण्यात येतो.
गुढीपाडवा अशा पद्धतीने साजरा करावा
१. अभ्यंगस्नान
रोजच्या स्नानाने आपल्या शरीरातील रज आणि तम गुण कमी होतात आणि सत्व गुण त्याच पटीने वाढतात. हे सत्व गुण तीन तास आपल्या शरीरात टिकून राहतात. पण, अभ्यंग स्नानाने हे सत्व गुण चार ते पाच तासपर्येंत टिकून राहतात असे म्हणतात म्हणून पाडाव्या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधी तेलाने मालिश करून अंघोळ केली जाते. नवीन वस्त्र परिधान केले जातात.
२. दाराची सजावट
दरवाजाला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. दरवाजामध्ये झेंडूची लाल फुले ठेवली जातात कारण लाल रंग हा शुभ मानला जातो. दारामध्ये रांगोळी काढली जाते.
३. पूजा
नवीन वर्षाची, नवीन दिवसाची सुरुवात म्हणून काही लोक ह्या दिवशी घरात ‘महाशांती’ पूजा करतात. ब्रह्मदेवाच्या उपासनेने ह्या पूजेची सुरुवात होते कारण कि, ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती असे म्हणतात. ‘दवणा’ हि सुगंधी वनस्पती ब्रह्मदेवाला अर्पण करतात, यज्ञ करून पूजेची सांगता होते. ह्यापूजेमळे घरात वर्षभर सुख-शांती नांदते असे म्हणतात.
४. गुढी कशी उभारावी
गुढी उभारण्याची दिशा हि दरवाजाच्या उजवीकडे असावी. गुढी उभारण्याची जागा स्वच्छ पुसून घ्यावी. ओल्या हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते. रांगोळी हे मांगल्याचे प्रतीक आहे, गुढीच्या बाजूला रांगोळी काढली जाते. गुढी हि उंचावर उभारावी कारण ती विजयाचे प्रतीक आहे.
५. गुढीची पूजा
गुढी हे ‘ब्रह्मध्वज’ किंवा ‘विजयध्वज (विजयाचे)’ चे प्रतीक मानले जाते. साधारणपणे सर्व मराठी कुटुंबामध्ये गुढी उभारली जाते. बांबूची एक मोठी काठी घेतली जाते तिला तेल आणि पाण्याने पुसून स्वच्छ करतात. काठीला हिरवी किंवा पिवळी रेशमी जरीची साडी नेसवितात, त्यावर चांदीचा किंवा तांबाचा तांब्या उपडा ठेवला जातो, तांब्यावर ओल्या कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते. गुढीला लाल फुल,फुलांची माळ , साखरेच्या गाठींची माळ , कडुनिबांची आणि आंब्याची पाने यांनी सजविले जाते. नैवेद्य दाखवून आरती केली जाते. सूर्योदयानंतर साधारणपणे पाच ते दहा मिनिटातच गुढी उभारली जाते कारण, सूर्योदयानंतर सूर्याचे तेज तत्त्व असते ते ह्या दिवशी घेतले तर खूप वेळेपर्येंत टिकून राहते असे म्हणतात. सूर्यास्ताआधी दूध साखरेचा नैवेद्य दाखवून गुढी उतरविली जाते.
६. पंचांग श्रवण
गुढीपाडवा हे मराठी नवीन वर्ष आहे ह्या दिवशी नवीन वर्षाचे पंचांग आणले जाते. पंचांगाची पूजा केली जाते आणि पंचांग वाचले जाते. मराठी कुटुंबात आजही शुभ कार्याची सुरुवात, मुहूर्त हे पंचांग वाचूनच होते.
७. तीर्थ
गुढीपाडव्यादिवशी तयार केल्या जाणाऱ्या तीर्थाला आयुर्वेदातही खूप महत्त्व आहे. कडुनिबांची कोवळी फुले, कैरी, जिरं, ओवा, हिंग, काळं मीठ, गूळ हे सर्व पदार्थ कुटून त्यात थोडे पाणी घालून तीर्थ तयार केले जाते. हे तीर्थ पिल्याने आपले शरीर वर्षभर निरोगी राहते असे म्हणतात. कडुनिबांत औषधी गुणधर्म आहेतच, बाकीच्या पदार्थात कडूंनीब मिसळून घेतल्यास त्यातली औषधी तत्त्वें आणखी वाढतात. जेवणात पुरण पोळी किंवा गोडाचा पदार्थ केला जातो.
८. जमिनीची नांगरणी
गुढीपाडव्याच्यादिवशी शेतकरी शेतात नांगरणी करतात. शेतकऱ्यांप्रमाणे बाकीचे लोकही आपल्या घराच्या अंगणातील माती थोडी उकरतात. असे केल्याने मातीची गुणवत्ता सुधारते असे म्हणतात. शेतकरी शेतीच्या उपकरणांची त्यावर अक्षता टाकून पूजा करतात.
कर्नाटक आणि आंध्रत गुढीपाडवा उगादी किंवा युगादी म्हणून साजरा केला जातो. काश्मीरमध्ये नऊ रोज, पंजाबमध्ये बैसाखी, चेटी चांद सिंधीमध्ये, नब बारशा बंगाल मध्ये, गोरू बिहू आसाम मध्ये, पुथन्दू तामिळनाडूमध्ये, विशू केरळ मध्ये साजरा केला जातो.
One Comment
Leave a Reply