गुढीपाडव्याची लगबग सध्या सुरु आहे. घरोघरी सध्या पाडव्याला गोडधोड करायची, गुढी उभारण्याची तयारी इथपासून नव्या वर्षांचा मुहूर्त साधत करायची खरेदी याचे प्लॅन्स बनत आहेत. या सगळ्यात तुम्ही आम्ही तर आहोतच पण सोबतच आपल्या आवडत्या मालिका आणि त्यातील कलाकारही आहेत.. अनेक मराठी मालिकांच्या सेट वर ही गुढीपाडव्याची तयारी सुरु आहे. अशाच लगबगीत whatshelikes ची टीम, झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतुन घराघरांत पोहोचलेल्या सर्वांच्या लाडक्या ‘मानसी’ ला, म्हणजेच अभिनेत्री मयुरी देशमुख हिला भेटली…
whatshelikes शी बोलताना मयुरीने तिचा पाडव्याचा बेत सांगितला. शूटिंगमुळे सुट्टी नसली तरी आपल्याला आवडणारी पुरण पोळी आणि कटाची आमटी हा या पाडव्याचा बेत असेल अस मयुरी म्हणाली. आता पाडवा सेटवरच साजरा होत असला तरी लहानपणी गुढीची तयारी आणि घरातली सजावट मयुरी आवडीने करायची तर तिची आई गुढीची साग्रसंगीत पूजा करायची. ह्या नवीन वर्षात सगळ्या नातेवाईकांना बोलावून गेट टुगेदर करण्याचा तिचा प्लान आहे.
सणावाराच्या निमिताने पारंपारिक मेन्यूचा आस्वाद घेणाऱ्या मयुरीला पुडिंग, चॉकलेट मूस, कुकीज अशा गोष्टी स्वतः बनवायला आवडतात. त्यातही वेगवेगळे फ्युजन करण्याचा प्रयत्न ती करत असते. नाचणी आणि चॉकलेट चिप्स कुकीज अशा नव्या जुन्याची सांगड घालणारे पाक प्रयोग ती वेळ मिळाला कि करत असते.
‘खाण्याची मला प्रचंड आवड आहे पण मी निरोगी खाण्यावर भर देते’ अस आवर्जून सांगणारी मयुरी ऑरगॅनिक वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देते.पारंपरिक पदार्थांचा तसंच आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टींचा स्वयंपाकामधे भरपूर वापर मयुरी करत असते. अभिनय क्षेत्रातल करिअर सांभाळत सवड मिळाल्यानंतर स्वतःच ऑरगॅनिक किचन गार्डन तयार करण्याची तिची इच्छा आहे.
‘मला शॉपिंग करायला खूप आवडत पण मी चुझी आहे. चार ठिकाणं फिरल्याशियाय मी शॉपिंग करत नाही. ब्रँडेड मॉल पासून फॅशन स्ट्रीटवर अगदी कोठेही मी स्मार्ट शॉपिंग करू शकते मात्र हल्ली शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे ऑनलाईन शॉपिंगवर भर असतो’ मयुरी तिच्या शॉपिंग प्रेमाबद्दल सांगत होती.
पेंटिंगची आवड असणारी मयुरी कविता करण, डान्स करणं अशा आवडीही जोपासतेय. फिरायला मला आवडतं… निसर्गाच्या सानिध्यात राहायला, तिथली संस्कृती जाणून घ्यायचा माझा प्रयत्न असतो अस मयुरी म्हणाली. वेळ मिळाला कि भारतात दार्जिलिंग, केरळ तर भारताबाहेर अमेरिका, ग्रीस ही ठिकाणं सध्या मयुरीच्या ट्रॅव्हल लिस्ट वर आहेत. नुकतीच ती मोरक्को येथे जाऊन आली आहे.
‘खुलता कळी खुलेना’ मध्ये डॉक्टर असणारी मानसी म्हणजेच मयुरी खऱ्या आयुष्यातही डॉक्टर आहे. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी तिने डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली आहे.
रंजक वळणावर असलेली ‘खुलता कळी खुलेना’ सध्या घराघरांत लोकप्रिय होते आहे. मालिकेबद्दल बोलताना मयुरी म्हणाली खूप चांगला प्रोजेक्ट आहे. सगळ्यांशी खूप छान बॉण्डिंग तयार झाले आहे. ओम,अभिज्ञा, शर्वरी म्हणजे गीता काकी आणि मी असा आमचा चार जणांचा खूप छान ग्रुप आहे. आम्ही एकमेकांमधल्या उणीवा सांगतो, कौतुक करतो. अभिज्ञा आणि मी खूप छान मैत्रिणी आहोत, विविध विषयांवर आम्ही गप्पा मारतो’ मालिकेतल्या वळणाबद्दल बोलताना मयुरी म्हणते ‘पुढे खुप सरप्राइसेस आहेत, रोज मालिका पाहत राहा’
मयुरीची सगळ्यात आवडती अभिनेत्री कंगना राणावत आहे. तर चार्लीस अँजेल्स हा तिचा ड्रीम रोल आहे. सहनशील, प्रेमळ अशा आताच्या मानसीच्या भूमिकेपेक्षा अगदी वेगळी भूमिका तिला भविष्यात साकारायची आहे.
प्रत्येक स्त्री ने स्वतःवर प्रेम करावं, स्वतःच व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी प्रयत्न करावे अस आपली मानसी म्हणजेच मयुरी देशमुख सांगते..
टीम whatshelikes तर्फे मयुरीच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !!!