उन्हाळा सुरु झाला आहे. बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये पाणी आणि थंड पेयं पिऊनच पोट भरते. जेवण नकोसे वाटते आणि त्यातही पूर्ण जेवण म्हणजे भाजी,पोळी,आमटी,भात नकोच.अशावेळेस जेवणासाठी एखादा थंड पदार्थ मिळाला कि किती बरं वाटतं आणि तो पदार्थ भाताचा म्हटले कि पोटभरही होतो आणि पचायलाहि हलका असतो. तो पदार्थ म्हणजे “दहीभात”. दहीभात हा पदार्थ दक्षिणेतला, तिथे जेवणाच्या शेवटी दहीभात घेतल्या शिवाय जेवण पूर्ण नाही होत. हा पदार्थ मी माझ्या बाबांच्या बेंगलोरच्या मित्राकडून शिकले. ते आमच्याकडे आले की हमखास हा दहीभात करायचे. लहानपणापासून बघितल्यामुळे मलाही तो जमतो.
दहिभातासाठीचा तांदूळ शिजविताना कूकर मध्ये डबा ठेवून तांदूळ शिजवण्यापेक्षा तांदूळ डायरेक्ट कूकर मध्ये शिजवला कि चांगला होतो. साधा भात शिजविताना आपण तो पाण्यात शिजवतो पण दहिभातासाठीचा भात शिजवताना त्यात अर्धे पाणी आणि अर्धे दूध घातले कि तो छान लागतो. शिजताना थोडे मीठही घालावे आणि पाण्याचं प्रमाण साध्याभातापेक्षा थोडे जास्त असावे. भात आसट शिजला पाहिजे. तांदूळ कोणतेही वापरू शकता पण शक्यतो आंबेमोहोर किंवा इंद्रायणी असेल तर चव चांगली लागते.
साहित्य:
२ वाट्या शिजलेला भात, १ वाटी दही, १ १/२ वाटी दूध, १ चमचा साखर, २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, कढीपत्ता, फोडणीसाठी थोडे जीरे, चार काजू, ४ काळी मिरी, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा उडीद डाळ, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा किसलेलं आलं, फोडणीसाठी थोडा हिंग.
कृती:
१. भात गरम असतानाच चमच्याने त्याला मऊसर घडसून घ्या आणि ताटात पसरवून गार करून घ्या.
२. गार झाला की त्यात दही आणि दूध घालून मिसळून घ्या. मीठ आणि साखर मिसळा.
३. आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवा त्यात ३-४ चमचे तेल टाका. तेल गरम झाले की जिरे, हिंग टाका. मग उडदाची डाळ लालसर तळून घ्या. नंतर मिरच्या, कढिपत्ता, कोथिंबीर, काजू तळून घ्या, शेवटी काळी मिरी टाका.
४. हि तळलेली फ़ोडणी भाताच्या मिश्रणात टाकून सर्व एकत्र करा. भातावर आल्याचा किस टाका.
५. दहीभात तयार झाला. सर्व्ह करताना आवश्यकतेप्रमाणे दूध किंवा दही मिक्स करा.
६. हा भात थंडही छान लागतो फ्रिज मध्ये ठेवून गार करून खाऊ शकता. पण अशावेळेस दूध दही एकदाच न घालता बेतानेच घालावे. कारण, भात थंड झाला की घट्ट होतो. सर्व्ह करताना दूध आणि दही घालून थोडा पातळ करून वाढावा.
७. आवडत असतील तर वरून डाळिंबाचे दाणे आणि उभे काप केलेले द्राक्षेहि टाकू शकता.
७. हा भात लोणचे किंवा शेंगदाण्याची चटणी सोबत छान लागतो. सोबत सांडगी मिरची आणि तळलेले पापड असेल तर आणखी छान!