बाळाचे सर्वात पहिले कार्यक्षम होणारे इंद्रिय म्हणजे स्पर्शेन्द्रिय. जन्मल्यानंतरच नाही तर गर्भावस्थेतल्या आठ आठवड्यांच्या गर्भालाही स्पर्श कळतो. जन्मल्यानंतरही स्पर्श व वास या दोन्ही संवेदना इतर संवेदनांपेक्षा लवकर कार्यक्षम होतात व म्हणूनच बाळाचा मसाज लाभदायक ठरतो.
मसाज म्हणजे नुसतेच तेल चोळणे नाही तर बाळाशी एकरूप होण्याचे एक तंत्र आहे. नियमित मसाजमुळे बाळाचे हृदय, रक्ताभिसरण, श्वसनसंथा, पचनसंस्था चांगल्या कार्यरत होतात. आईच्या उबदार स्पर्शातून बाह्य जगाशी नाते जोडण्याचे शिक्षण बाळाला मिळते. या मसाजाचा आईलाही फायदा होतो. वात्सल्यामुळे तिचे दूध वाढते. बाळात व तिच्यात एक वेगळा स्पर्शरुपी पाश तयार होतो व म्हणूनच बाळाचा मसाज आईनेच किंवा पित्याने द्यायला हवा.
मसाजमुळे बाळाच्या शरीरात एन.के पेशी (ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते ) वाढतात असे संशोधनात आढळून आले आहे. तसेच शरीरातील स्स्ट्रेस हॉर्मोन्स ची लेव्हल कमी होते, असेही सिद्ध झाले आहे.
बाळाला चांगली झोप लागते, वजन वाढते, तेलामुळे त्वचेचे पोषण चांगले होते, स्नायू बळकट होतात व बाळासाठी हा एक आनंददायी अनुभव होतो.
मसाजची तयारी
मसाज करण्याआधी सर्व तयारी स्वतःजवळ करून ठेवावी. आईने प्रथम रिलॅक्स व्हायला हवे. त्यासाठी तीन चार श्वास घेऊन मन स्थिर करावे. मनातील इतर विचार बाजूला ठेवून मी व माझे बाळ ह्यावर लक्ष केंद्रित करावे. बाळाचे नाव घेऊन माझ्या हातातून वात्सल्याचा वर्षाव होत आहे असे म्हणावे. एखादे गाणे दररोज तेच ते म्हणावे. आईची प्रत्येक हालचाल, तिचा आवाज व या साऱ्यांना बाळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या साऱ्यांचे जे मिश्रण तोच खरा बेबी मसाज.
मसाजासाठी तेल
आयुर्वेदाने तिळाचे तेल हे मसाजासाठी उत्तम मानले आहे. बाळाला वापरताना हे तेलही निर्जंतुक करून घ्यावे. त्यासाठी तेलाला एखादी उकळी येईपर्यंत गरम करावे. तेल नाकात, डोळ्यात, कानात घालू नये. बाळाच्या त्वचेवर काहीही वापरण्याआधी सर्वप्रथम त्याच्या मनगटावर लावून थोडे चोळावे. दुसऱ्या दिवशीपर्यंत काही तक्रार उद्भवली नाही की मग ते वापरने सुरक्षित आहे असे समजावे.
मसाजाची पद्धत
परंपरागत मांडीवर बाळाला उपडे व पालथे घालून मसाज करावा किंवा बेडरूम मध्ये बेडवर पाठीला टेकून बसून मांडीत उशी ठेवून त्यावर बाळाचे डोके ठेवून आरामात मसाज द्यावा. स्वतःला व बाळाला आवडेल असे तंत्र व वेळ आपणच शोधून काढावी.
पाय: पाय-स्नायूंना हलके मालिश करून पायाची बोटे हळूहळू ओढावीत, तळपायावर दाबून वर्तुळाकार मसाज द्यावा. फूट रिफ्लेक्सऑलॉजी या शास्त्रानुसार शरीरातल्या सर्व अवयवांची मर्मस्थाने तळपायावर असतात. दोन्हीं हातात पाय घेऊन रोलिंग करावे.
पोट: पोटावर, बेंबीभोवती कोमट तेलाने घड्याळ्याच्या दिशेने वर्तुळ करावे. शूच्या जागेपासून बाहेर असे अंगठ्याने मालिश करावे.
सन मून स्ट्रोक: हाताचा तळवा बेंबीच्या खाली ठेवून बोटांनी पोटावर डावीकडून उजवीकडे, वर परत हात उचलून डावीकडून उजवीकडे, असे सहा ते सात वेळा करावे.
आय लव्ह यू स्ट्रोक : बाळाच्या मोठ्या आतड्यातला गॅस किंवा वात काढण्यासाठी या स्ट्रोकची मदत होते. पोटावरून उजवीकडून खालच्या जागेहुन वरपर्यंत दोन्ही आंगठ्यांनी हलका मसाज करावा. मग बाळाच्या उजव्या बाजूने मोठे आतड्याच्या दिशेने मसाज करावा. नंतर वरून खालपर्यंत लघवीच्या जागेपर्यंत हा मसाज थांबवावा.
छाती : छातीवर तळहातांनी मध्यभागापासून कडेला असे एकामागोमाग एक करावे.
हात: पायासारखाच मसाज.
डोके: टाळूवर तेल घालावे. डोक्याच्या त्वचेला हलका मसाज करावा. कानामागील त्वचेवर गोलाकार फिरवावे.
नाक: नाकाच्या मध्यभागी(डोळ्यांच्या मध्ये ) चिमटीत नाक धरून मसाज करावा. त्या ठिकाणी असलेल्या डोळ्यातून सुरु होऊन नाकापर्यंत जाणारे डोळ्यातील अश्रू वाहून नेणारी नलिका साफ होतात म्हणून डोळ्यातून पाणी गळण्याचे प्रमाण कमी होते.
पाठ: बाळाला नंतर पालथे घालावे. वरून खाली असे हाताने उभे मसाज करावेत. नंतर मध्यभागाकडून कडेला असे तळहाताने दाबून मसाज करावा. कुल्ल्यावर गोल वर्तुळे करावीत. परत पायाला मागच्या बाजूला खालून वर हृदयाकडे असे मालीश करावे