आपल्याकडे लोणच्याचे निरनिराळे प्रकार आणि ते बनविण्याच्या अनेक पद्धती आहेत. आंध्र प्रदेशात केले जाणारे लोणचे हे जास्त तेलाचे जास्त मसाल्याचे असते म्हणून ते अगदी नुसत्या भातासोबतही खायला छान लागते. अतिशय सोपी आणि मोजकेच साहित्य वापरून केलेली लोणच्याची ही कृती नक्की करून पाहा!!
सर्वात आधी साठवणीसाठी लागणारी काचेची किंवा सिरॅमिकची भरणी साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि उन्हामध्ये वाळत ठेवा. वाळल्यानंतर भरणीमध्ये पाण्याचा थोडाही अंश नको आणि भरणी किंचितशी गरम व्हायला हवी. जास्तवेळ उन्हात ठेवल्यास तडकू शकते.
आता लोणच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे तिखट, हळद, मेथ्या, मोहरी कोरडे आहे का तपासून घ्या नाहीतर एखाद्या तासाभरासाठी उन्हात वाळत ठेवा.
मिक्सरचे भांडेही स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या. मोजमापे, चमचाही धुवून वाळवून घ्यावी.
लोणच्यासाठी लागणारी आंबे ताजे, आंबट, घट्ट आणि रंगामध्ये गडद हिरवी असावीत.
साहित्य
६ कप कैरीच्या फोडी
२ कप तेलं
१ कप मोहरीची पॉवडर
१ कप लाल तिखट
३/४ कप मीठ
१.५ चमचा मेथीदाणा पॉवडर
१ कप किसलेला गूळ
१/२ चमचा हिंग
१ चमचा हळद आणि ५ चमचे मीठ
कृती
भरपूर पाण्यामध्ये कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या.
मोठ्या सुरीने अथवा विळीने कैरीच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्या. कैरीच्या आतील कोय आणि टणक भाग पूर्णपणे काढून टाका.
एका मोठ्या भांड्यात कैरीच्या फोडी, ५-६ चमचे मीठ आणि एक चमचा हळद मिक्स करून हे मिश्रण ७-८ तास झाकून ठेवा. साधारणपणे रात्रभर ठेवावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या भांड्यात कैरी आणि मीठाचे भरपूर पाणी सुटलेले दिसेल त्याच पाण्यात कैरीच्या फोडी स्वच्छ धुवून घ्याव्यात. आणि ते पाणी फेकून द्यावे.
आता एका पातळ सुती कापडाने फोडी पुसून कोरड्या करून घ्याव्यात आणि पंख्याखाली किंवा उन्हात ३ तास सुकवून घ्याव्यात.
मसाल्याचे साहित्य तिखट, मीठ, मेथीदाणा पॉवडर, मोहरी पॉवडर, हिंग, किसलेला गुळ सर्व एकत्र करून घ्यावे.
आता एका पळीत कैरीच्या फोडी घ्या त्या तेलाच्या भांड्यात एकदा बुडवून घ्या आणि पुन्हा मसाल्यात एकदा घोळवून घ्या आणि भरणीत टाका.
अशा प्रकारे सगळ्या कैरीच्या फोडी तेलात आणि मसाल्यात घोळवून घ्या.
शेवटी उरलेलं तेलं आणि मसाला भरणीत वरून टाकून द्या.
भरणी हलवून वरून स्वच्छ फडक्याने बांधून झाकण लावून कोरड्या जागी ठेवा.
३ दिवसांनी झाकण काढून बघा लोणच्याच्या वरती तेलाचा तवंग आलेला दिसेल. कोरडया चमच्याने चव बघा मीठ कमी असेल तर वरुतून घालून लोणचे एकदा हलवून ठेवा.
टीप- लोणच्याच्या वरती तेलाचा तवंग येणे आवश्यक आहे नाहीतर लोणचे लवकर खराब होऊ शकते.
रोजच्या वापरासाठी लागणारे लोणचे एका छोट्या बाटलीत काढून घ्या. वारंवार भरणी उघडं बंद केली तर लोणचे लवकर नासते.
भरणीत बुडवायचा चमचा कोरडा असणे आवश्यक आहे