मशरूम खाण्याचे भरपूर फायदे आहेत जसे ह्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन C, कॅल्शियम, खनिजे असतात. लहान मुलांच्या आहारातही मशरूमचा वापर आवर्जून करावा पण माहिती असूनही आपण अशा भाज्या आणायच्या टाळतो. कारण ह्याची बनवायची पद्धत क्लिष्ट आहे असे आपणास वाटत असते. पण असे नाही मुशरूमचे पदार्थ बनविण्यास खूप सोपे, झटपट आणि चवदार होतात.
मशरूम फ्राईड राईस
साहित्य : १०-१२ मशरूम स्वच्छ साफ करून मोठ्या फोडी करून घ्याव्यात, एक मोठा कांदा बारीक चिरून, ५ लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं ठेचून, अर्धी वाटी कांदा पात बारीक चिरून, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, पुदिन्याची ५-६ पानं, १/२ चमचा काळी मिरी पूड, ३ चमचे सोया सॉस, मीठ चवीनुसार, दोन वाट्या तांदळाचा भात मोकळा शिजवून, ४ चमचे गोडं तेलं.
कृती:
-एका मोठ्या कढईमध्ये तेलं गरम करून घ्यावे, तेल गरम झाले कि आलं-लसूण पेस्ट तळून घ्यावी, आता हिरवी मिरची टाकून परतवून घ्यावी.
-हिरवीमिरची तळली कि कांदा गुलाबीसर तळून घ्यावा, आता मशरूमच्या फोडी तेलं सुटेपरेन्त परतवून घ्या.
-तेलं सुटले कि सिमला मिरची, कांदा पात, पुदिना पाने, काळी मिरी पूड,मीठ, सोया सॉस एक मिनिट शिजवून घ्या.
-आता मिश्रणात शिजलेला मोकळा भात मिक्स करून घ्या. झाकण ठेवून भाताला एक वाफ येऊ द्या.
मशरूम फ्राईड राईस तयार!!
मशरूम मसाला
साहित्य:
१ पॅकेट मशरूम त्यात साधारणत: १२ मशरूम असतात, १ मध्यम आकाराचा कांदा, २ मोठे टोमॅटो, ४ लसूण पाकळ्या, १ हिरवी सिमला मिर्ची, जिरं फोडणीसाठी, १/२ चमचा हळद पावडर, १ चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, धने पावडर १/२ चमचा, ४ चमचे गोडं तेल आणि थोडी कोथिंबीर.
कृती:
प्रथम मशरूम स्वच्छ धुऊन पुसून घ्यावेत एका मशरूमचे चार उभे भाग करावेत, कांदा बारीक कापून घ्यावा, टोमॅटो मोठे कापून कच्चेच मिक्सरमधून बारीक प्युरी करून घ्यावी, लसूण पाकळ्या ठेचून घ्याव्यात, सिमला मिर्ची बारीक कापून घ्यावी.
-सर्वप्रथम कढईमधे तेल टाकून गरम करून घ्यावे त्यात जिरं टाकावे नंतर लसूण तळून घ्यावा, आता कांदा परतवून घ्यावा कांदा गुलाबी झाला कि त्यात मशरूमच्या फोडी टाकाव्यात.
-मशरूममध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पाणी आटेपर्यंत त्याला परतून घ्या. पाणी कमी झाले कि तेल सुटते आता त्यात टोमॅटोची प्युरी मिक्स करा आणखी एक मिनिट तेल सुटेपर्यंत भाजी शिजू द्या.
-आता त्यात हळद, मीठ, तिखट, धन पावडर टाकून छान हलवून घ्या शेवटी सिमला मिरचीच्या फोडी टाकून भाजी हलवून घ्या.
-ग्रेव्ही खूप दाट झाली असल्यास अर्धी वाटी पाणी मिसळून एक उकळी काढून घ्या. चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी पोळीसोबत किंवा भातासोबत गरम गरम वाढा.