भोगीची भाजी हा पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजीचा प्रकार आहे जी की मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी नैवेद्यासाठी बनविला जातो. हिवाळ्यात उपलब्ध होण्याऱ्या सर्व भाज्यांची एकत्र मिक्स भाजी म्हणजे भोगीची भाजी. चमचमीत अशी ही भाजी बाजरीची भाकरी आणि लोण्यासोबत खाल्ली जाते, सोबत मेथीची भाजी, डाळ तांदळाची खिचडी-चटणी असा बेत भोगीच्या दिवशी असतो. जे पदार्थ ज्या दिवशी बनवायचे असतात त्या दिवशी त्याची चव निराळी लागते, इतर कोणत्याही दिवशी तो पदार्थ बनविला तर ती खास चव नाही येत म्हणून भोगीच्या दिवशी ही भाजी नक्की करून पाहा.
साहित्य
४-५ जणांसाठी
वेळ २५ मिनिटं
१/२ कप ओले हरभऱ्याचे दाणे
१/२ कप वाटाण्याचे दाणे
१/२ कप पावट्याच दाणे
१/४ कप कच्चे शेंगदाणे (२ ते ३ तास पाण्यात भिजवून)
१/२ कप वांग्याच्या फोडी
१ मोठा बटाटा सालं काढून मोठ्या फोडी
१ कप गाजराच्या मोठ्या फोडी
एका शेवग्याच्या शेंगांच्या फोडी (५ मिनिटं पाण्यात उकळून बाजूला काढून ठेवाव्यात)
एक कप चाकवत चिरून
अर्धा कप पापडीच्या शेंगा कापून
फोडणीसाठी
३-४ चमचे तेलं
अर्धा कप कांद्याच्या फोडी
६-७ लसूण पाकळ्या ठेचून
४-५ कढीपत्त्याची पानं
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ चमचा मोहरी दाणे आणि जिरं
अर्धा चमचा हिंग
चवीपुरते मीठ
२ चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
२ चमचा तीळ भाजून कूट
२ चमचा खोबरं भाजून कूट
२ चमचा चिंचेचा कोळ
१ चमचा गुळ
कृती
प्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात तेलं गरम करून घ्यावे त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या परतवून घ्याव्यात. नंतर लसूण आणि कांदा लालसर परतवून घ्यावा.
कांदा तळल्यानंतर सर्वप्रकारचे दाणे आणि शेंगदाणे टाकून झाकण लावून एक मिनिटं वाफ काढून घ्यावी. आता त्यात गाजर, बटाटा, वांगी, पापडीच्या शेंगा, चाकवत टाकून सर्व भाज्यांची झाकण ठेवून ५ मिनिटं वाफ काढून घ्यावी.
आता त्यात मीठ, तिखट, हळद, चिंच आणि गुळ, तीळ आणि खोबऱ्याचा कूट टाकून भाज्या छान हलवून घ्याव्यात. परत एकदा झाकण ठेवून ५ मिनिटं वाफ काढून घ्यावी.
५ मिनिटांनी ४ वाट्या गरम पाणी घालून छान ढवळून घ्यावे. आता उकळलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून झाकण झाकुन भाजी मंद आचेवर १० मिनिटं किंवा शिजेपर्यंत उकळून घ्यावी.
चव पाहून लागल्यास तिखट मीठ टाकावे.
बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम भाजी सर्व्ह करावी. रस्स्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.