‘जवसाची चटणी’ खूप पूर्वीपासून आपल्याकडे बनविली जाते अगदी आपल्या आजीच्या किंवा त्याहूनही आधीच्या काळापासून आपल्याकडे ती बनविली जाते. ह्यावरूनच त्या काळातही जवसाचे किती महत्व होते हे लक्षात येते. आजकाल जवसाला flaxseed हे नाव मिळाल्यामुळे परत एकदा त्याचे महत्व नावारूपाला आलं आहे.
साहित्य
– एक वाटी जवस
– अर्धा चमचा जीरे
– चवीपुरते मीठ
– १ चमचा लाल तिखट
– ५-६ लसूण पाकळ्या (ऐच्छिक)
कृती
– एका कढईत जवस भाजून घ्या. जवस भाजण्याआधी एक चमचा कच्चे जवस बाजूला काढून ठेवा. कारण जवस भाजताना अंदाजा येत नाही आणि बराच वेळा ते जास्त लाल होऊन करपले जातात. म्हणून कच्चे आणि भाजलेले टॅली करण्यासाठी माझी ही पद्धत आहे.
– आता भाजलेले जवस, लसूण, मीठ, लाल तिखट, जिरे सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
– आवडत असल्यास अर्धी वाटी भाजलेले सुके खोबरे, भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटताना ऍड करू शकता.
– ह्या चटणीवर कच्चे तेलं टाकून भाकरीसोबत खाण्याची पद्धत आहे. किंवा कोरडी चटणी दह्यात कालवून वरतून फोडणी टाकूनही छान लागते.