छोले भटूरे हा पंजाबी पदार्थ म्हटला जातो पण आजकाल पंजाबी नसलेल्या घरातही तो सर्रासपणे बनविला जातो. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणासाठी/रात्रीच्या जेवणासाठी तीन त्रिकाळ चालण्यासारखा आहे. बर्थडे पार्टी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठीही छोले भटूऱ्यांचा बेत उत्तम होऊ शकतो. सोबत जिरा राईस आणि कांद्याची दही घालून कोशिंबीर केली तर संपूर्ण जेवणच होऊ शकते.
प्रत्येक घरात छोले बनविण्याची विधीही वेगवेगळी आहे कोणी सुक्के खोबरं आणि कांद्याचे वाटण घालून बनवितात तर कोणी नारळाचे दूध वापरतात काही घरात प्यूरी न वापरता चिरलेला कांदा टोमॅटो वापरला जातो. कृती कशीही असो छोले छान शिजलेले असावेत आणि मसाले योग्यप्रमाणात ते छानच लागतील. सोबत भटूरे असतील तर ते आणखी छान लागतात.
खाली दिलेली छोले भटूऱ्याची कृती अत्यंत सोपी आहे. करून बघा आणि कशी झाली ते नक्की कळवा ?
भटूरे
१५ ते १६ नग
वेळ- २ तास पीठ भिजण्यासाठी १/२ तास बनविण्यासाठी
साहित्य-
२ वाट्या मैदा
२ चमचे बारीक रवा
१/२ tsp बेकिंग पावडर
१/४ tsp बेकिंग सोडा
१/२ चमचा मीठ
१/२ चमचा साखर
२ चमचे तेलं
१/२ वाटी आंबूस दही
तळण्यासाठी तेलं
कृती
मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ चाळणीने चाळून घ्यावे.
चाळलेल्या मैद्यात रवा, साखर, तेलं टाकून हाताने छान मिक्स करून घ्या. आता ह्या मिश्रणात थोडे थोडे दही टाकून घट्ट गोळा होईपर्यंत पीठ मळून घ्यावे. पीठ सैल नसावे कारण बेकिंग सोडा आणि पावडर मूळे ते फसफसते आणि आणखी जास्त सैल होतें.
मळलेलं पीठ ओला सुती कपडा झाकून २ तास भिजत ठेवा.
दोन तासांनी पीठ जास्त सैल झाले असेल तर २ चमचे मैदा घालून थोडे मळून घ्यावे.
पिठाच्या साधारण १५ ते १६ बोट्या करून थोड्या जडसारच लाटून घ्याव्यात. जास्त पातळ लाटले गेले तर पुऱ्या फुगत नाहीत. लाटताना पोळीपाटावर थोडा मैदा भुरभूरावा. अशाप्रकारे सगळ्या बोट्यांच्या गोल पुऱ्या लाटून घ्याव्यात.
मध्यम आकाराच्या कढईत २ वाट्या तेलं चांगले गरम होऊ द्यावें. तेलं गरम झाले आहे का तपासण्यासाठी पिठाचा छोटा गोळा तेलात टाकून पहा. तो तळून वरती आला म्हणजे तेलं चांगलं तापलं आहे.
आता एक एक पुरी तेलात दोन्ही बाजुंनी थोडी लालसर तळून घ्या.
गरम भटूरे खाण्यासाठी तयार आहेत. छोल्यासोबत सर्व्ह करा.
छोले
४ जणांसाठी
वेळ- ३५ ते ४० मिनिटे
साहित्य
११/४ वाटी कबुली चणे (५-६ तास पाण्यात भिजवून)
२ मोठें लाल टोमॅटो (मोठया फोडी कापून)
१ मोठा कांदा (मोठया फोडी कापून)
१ चमचा दही
५-६ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा
१ हिरवी मिरची
३ लवंगा, २ वेलची, दालचिनीचा छोटा तुकडा, ३ काळी मिरी, १/२ चमचा जिरं
लाल तिखट आणि मीठ चवीनुसार
१ १/२ छोले मसाला किंवा गरम मसाला
१/२ चमचा हळद
१ चमचा साखर
३ चमचे फोडणीसाठी तेलं
१ चमचा फ्रेश क्रीम किंवा साय
१/२ चमचा अमूल बटर
१ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम छोट्या कुकरमध्ये भिजलेले काबुली चणे ११/२ वाटी पाणी टाकून शिजवुन घ्यायचे आहेत. साधारणपणे ४ शिट्या करून घ्या. चणे खूप मऊ होईपर्यंत शिजवायचे नाहीयेत, शेवटी आणखी एकदा मसाल्यांसोबत शिट्या करून घ्यायच्या आहेत.
आता एका कढईत खडा मसाला लवंगा, वेलची, दालचिनी,मिरी, जिरं भाजून घ्या आणि एकिकडे काढून ठेवा आता त्याच कढईत कच्चा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या (तेलाशिवाय), कांदा लाल झाला की टोमॅटो, लसूण, मिरची, आलं टाकून टोमॅटो थोडे मऊ होईपर्यंत भाजून घ्यावे.
भाजलेले पदार्थ थोडे गार होण्यासाठी ताटात पसरवून ठेवा. आता मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला खडा मसाला बारीक करून घ्या त्यातच भाजलेले सगळे जिन्नस आणि एक चमचा दही घालून बारीक पेस्ट होईस्तोवर वाटून घ्या. छोल्यासाठीची प्युरी तयार आहे.
ज्या कुकरमध्ये चणे शिजवून घेतले ते कुकर परत फोडणीसाठी गॅसवरती ठेवा, कुकर गरम झाले की ३ चमचे तेलं टाका. आता तेलात सगळी प्युरी ओता. त्यात, तिखट, मीठ, हळद, साखर आणि छोले मसाला टाकून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या.
तेलं सुटले की त्यात शिजलेले छोले पाण्यासकट टाका आणि चव बघा. काही कमी असेल तर ते जिन्नस परत टाका. आता परत एकदा कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणून पाण्याचे प्रमाण मध्यम ठेवा जास्तीही नको आणि खूप कमीही नको.
(कुकर मंद आचेवर ठेवायचा आहे म्हणजे छोले छान शिजतील) ४ शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करुन कुकर गार होईपर्यंत वाट बघा. कुकर गार झाले की छोले छान मऊ झालेलं दिसतील आणि वरती तेलाचा तवंग आलेला दिसेल म्हणजे छोले परफेक्ट झाले आहेत असे समजायला हरकत नाही. छोले जर खूप पाणीदार झाले असतील तर आणखी दाट होण्यासाठी झाकणाशिवाय कुकर गॅस वरती ठेवा ५-१० मिनिटात ते छान शिजतील.
छोले तयार आहेत वाढणीसाठीच्या भांड्यात काढून ठेवा वरतून फ्रेश क्रीम, बटर आणि कोथिंबीर टाकून गरम भटूऱ्यासोबत सर्व्ह करा.
टीप – वरती दिलेली कृती वापरून राजमाही बनविता येतो.