“चिरोटे” हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडाचा पदार्थ आहे जो सणावाराच्या दिवशी आणि खासकरून दिवाळीच्या फराळासाठी तयार केला जातो. साजूक तुपात तळलेला हा पदार्थ खुसखुशीत होतो. नुसता तळलेला चिरोटा बिनसाखरेचा पण छान लागतो बेकरीत मिळणाऱ्या खारीसारखा लागतो. पण खारीपेखा नक्कीच पौष्टिक. गोड न खाणाऱ्यांसाठी किंवा कमी गोड खाणाऱ्यांसाठी साखरेचे प्रमाण कमी-जास्त करून करता येतो.
चिरोटे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत कोणी फक्त मैद्याच्या करतात तर कोणी मैदा आणि रवा मिक्स करून करतात, साट्यासाठी बरेच जणं तांदळाची पिठी वापरतात तरी काहीजण कॉर्नफ्लॉवर वापरतात, चिरोटे लाटण्याच्या पण दोन पद्धती आहेत गोल आणि उभी. पहिल्यांदा करताना दोन्ही पद्धतीने १-१ लाटून बघा कारण बऱ्याचवेळा गोल चिरोट्याचे पदर तुपात तळताना निसटतात. तळलेले चिरोटे पिठीसाखरेचे आणि पाकातले दोन्हीही छान लागतात.
हा पदार्थ खूप दिवसांपासून माझ्या to-do लिस्ट मध्ये होता दिवाळीच्या निमित्ताने करून पहिला आणि जमालाही
साहित्य-
२० चिरोट्यांसाठी
२ वाटी मैदा
पाऊण वाटी पिठी साखर
२ चमचे कडाडीत गरम तूप
१/४ चमचा मीठ
१/२ चमचा बेकिंग पावडर
थोडा गुलाबी रंग
१/२ वाटी तांदळाची पिठी (साट्यासाठी)
३ चमचे पातळ तूप (साट्यासाठी)
पीठ भिजवण्यासाठी थोडे दूध
तळण्यासाठी तूप.
कृती-
मैदा, मीठ, बेकिंग पावडर एकत्र करा, दोन मोठे चमचे तूप चांगले कडकडीत गरम करा नाहीतर चिरोटे मऊ पडतात.
अंदाज्याने दूध घालून पीठ भिजवून घ्या (करंजीच्या पिठाप्रमाणे) त्या पिठाचे तीन भाग करा, एका भागात गुलाबी रंग मिसळा.
तूप थाळीत हाताने फेटून घ्या त्यात तांदळाची पिठी मिसळवून घ्या साटा तयार झाला हा साटा पाण्यात टाकून बघा तो पाण्यावर तरंगायला हवा.
पांढऱ्या पिठाच्या २ आणि रंगीत १ अश्या तीन पोळ्या पिठी लावून पातळ लाटून घ्या. पोळी पातळ लाटली तरच छान पदरं सुटतात.
एका पोळीवर अर्धा चमचा साटा पसरवून घ्या. त्यावर रंगीत पोळी ठेऊन त्यावरही साटा पसरावा. पुन्हा पांढरी पोळी ठेवा त्यावरही साटा लावा.
त्याची गुंडाळी करा आणि ओल्या कपड्याखाली झाकून ठेवा.
नंतर त्याचे अर्ध्या इंचाचे तुकडे कापून घ्या.
कापलेली बाजू वर करून अलगद हाताने थोड्या तांदळाच्या पिठीवर चिरोटा लाटा.
नंतर कढईत तूप तापले कि, त्यात एकेक चिरोटा घाला. कढईत टाकल्याबरोबर जरा खाली दाबा आणि तूप उडवून छान तळून घ्या. काट्या चमच्याने पदरं थोडी उकलून घ्या. तळल्यावर अगदी गुलाबाच्या फुलासारखा दिसतो.
सगळे चिरोटे तळून झाले कि पिठी साखर भुरभुरा.
गार झाले कि हवाबंद डब्यात भरून ठेवा म्हणजे ते मऊ पडणार नाहीत .
(साट्यासाठी तांदळाची पिठी ऐवजी कॉर्नफ्लोअर पण वापरू शकता, तळण्यासाठी तूपाऐवजी तेलही वापरू शकता, अर्ध्या इंचाचे काप लाटताना कापलेल्या बाजूएवजी गुंडाळी केलेली बाजूही अलगद लाटू शकता ह्या चिरोट्याचा तळल्यानंतर आकार वेगळा दिसतो, सजावटीसाठी वरतून सुकामेवा आणि वेलची पावडर टाकू शकता.)