गणेशोत्सवाची सगळीकडे धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. प्रत्येकाकडे नैवेद्यासाठी विविध पदार्थ केले जातात. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी प्रामुख्याने मोदक केले जातात. मधल्या आठ दिवसात सकाळ-संध्याकाळी नैवेद्याला काय करायचे असा प्रश्न असतो आणि दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्यांचीही वर्दळ असते तेंव्हा एखादा गोडाचा पदार्थ लागतोच. खलील काही सोपे पदार्थ आम्ही सुचविले आहेत. करून पाहा आणि आम्हाला कळवा.
१. शेवई खीर
४ जणांसाठी
साहित्य:
१/२ कप बारीक शेवई
१/२ लिटर दूध
साखर १/४ कप
४-५ काजु, ४ बदाम
१/४ चमचा वेलदोडा पावडर
४-५ केशर काड्या ३ चमचे दुधात भिजवून
४ चमचे चांगले तूप
कृती:
१. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध आटवायला ठेवून द्या. एका मोठ्या कढई मध्ये एक चमचा तूप टाकून काजू लालसर तळून घ्या. काजू काढून त्याच कढईमधे एक चमचा तूप टाकून शेवया गुलाबीसर भाजून घ्या. अगदी बारीक आचेवर कढई ठेवा नाहीतर शेवया लगेच करपून जातात.
२. दूध थोडे आटले की भाजलेल्या शेवयांमध्ये दूध टाकून ढवळून घ्या. त्यात साखर, वेलदोडा पूड, बदाम टाकून ५-७ मिनिटे शेवया शिजेपर्यंत उकळू द्या.
३. शेवटी गॅस बंद करून सर्विंग बोल मध्ये खीर काढून घ्या वरतून तळलेले काजू आणि केशर आणि एक चमचा पातळ तूप टाका.
खीर गार झाली कि दाट होते त्यामुळे वाढताना थोडे दूध टाकून सैल करा.
नैवेद्यासाठी खीर तयार !!
२. दलिया खीर
४-५ जणांसाठी
साहित्य:
१ १/२ वाटी दलिया
१ १/२ वाटी किसलेला गूळ
१ चमचा बडीशेप
१/२ चमचा वेलची पूड
१/४ वाटी खोबऱ्याचा किस
४ बदाम
५-६ काजू
२ चमचे चांगले तूप
१/२ लिटर दूध
कृती:
१. एका भांड्यात दलिया धुवून थोडे पाणी ठेवून अर्धा तास भिजत ठेवा.
२. अर्ध्यातासानंतर छोट्या कूकरमध्ये पुरेसे पाणी घालून दलिया शिजवून घ्या. साधारण ४-५ शिट्या होऊ द्या.
३. तोपर्येंत बडीशेप, खोबऱ्याचा किस, वेलची, काजू- बदाम २ चमचे साखर घालून मिक्सरमध्ये जाडेभरडे वाटून घ्या.
४. आता दलिया शिजला का बघा, पाणी पूर्णपणे आटले असेल तर एक वाटी गरम पाणी टाकून कूकर पुन्हा बारीक गॅस वर ठेवा. आणि पळीने दलिया चांगला घडसून घ्या.
५. आता किसलेला गूळ आणि खोबरे, वेलची , बडीशेप, बदामाची पूड टाकून खीर चांगली हलवून घ्या.
६. शेवटी 2 वाट्या दूध आणि तूप टाकून खीर चांगली घोटून घ्या.
खीर नैवेद्यासाठी तयार.
ही खीर दूध न घालता नुसते तूप घालून गरम छान लागते. एकाचवेळी सगळे दूध टाकू नका कारण खीर गार झाली की खूप दाट होते. सर्व्ह करताना दूध घालून सैल करून वाढा.
३. नाचणीचा शिरा
२-३ जणांसाठी
साहित्य:
१ वाटी नाचणीचे पीठ
अर्धी वाटी साखर
१ वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध यांचे मिश्रण
१/४वाटी + २ चमचे तूप
थोडे बदामाचे काप
कृती:
१. एक कढईत नाचणीचे पीठ मध्यम आचेवर भाजत ठेवा. पीठ चांगले गरम झाले की १/२ वाटी तूप टाकून पीठ चांगले एकजीव करून घ्या. आणि खमंग सुवास येईपर्यंत पीठ भाजत राहा.
२. दुसऱ्या गॅस वर दूध आणि पाण्याचे मिश्रण उकळत ठेवा.
३. पीठ चांगले भाजले की त्यात साखर आणि बदामाचे काप टाकून अर्धा मिनिट मिश्रण परतवून घ्या.
४. आता उकळते दूध पाणी भाजलेल्या पीठात ओतून मिश्रण पटपट एकजीव करा. वरतून २ चमचे तूप टाकून शिरा झाकून चांगली वाफ येऊ द्या.
शिरा नैवेद्यासाठी तयार!!
अशाचप्रकारे कणकेचा शिरा तयार करता येतो.
४. वळीचे लाडू
साहित्य:
२ वाट्या कणिक
१ वाटी किसलेला गूळ
२ चमचे पातळ तूप
मळण्यासाठी थोडे दूध
तळण्यासाठी तेल
कृती:
१. एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धी वाटी कोमट दूध घ्या त्यात किसलेला गूळ टाकून गूळ विरघळेपर्यंत ढवळत रहा.
२. गूळ विरघळला की त्यात कणिक आणि तूप टाकून कणिक घट्ट मळून घ्या. पिठाच्या छोट्या बोटया करून घ्या.
३. हाताला थोडे तेल लावून बोटिची वळी करून घ्या तिला ताटात ठेऊन गोल गुंडाळून घ्या आणि गरम तेलात तळा.
५. खिरापत
साहित्य:
एक वाटी किसलेलं सुकं खोबरे
३ चमचे पिठी साखर
थोडी खडी साखर
४ बदाम ४ काजूची भरड
२ खारकांची भरड
कृती :
वरील सर्व साहित्य एकत्र करा खिरापत तयार. खिरापतीत मुख्य घटक खोबऱ्याचा किस, पिठी साखर आणि खडीसाखर हे असतात. सुकामेव्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदल करू शकता.
हा पदार्थ ऐन वेळी किंवा गडबडीच्या वेळी नैवेद्यास ठेवण्यासाठी बरा पडतो.
६. सुंठवडा
वरील खिरापतचे सगळे साहित्य एकत्र करा आणि त्यात १ चमचा सुंठ पावडर टाका, सुंठवडा तयार. हे सोपे पदार्थ तुम्ही आधी करून डब्यात घालून तयार ठेवू शकता.
७. दूध साखर भात
३ जणांसाठी
साहित्य:
अर्धी वाटी बारीक तांदूळ
२ वाट्या दूध
१ वाटी साखर
१ चमचा वेलची पावडर
२ चमचे तूप
कृती:
१. तांदूळ स्वच्छ धुवून दूध उकळत ठेवा. दूध उकळले की धुतलेले तांदूळ टाका.
२. तांदूळ शिजत आले की साखर आणि वेलची पावडर टाका.
३. पळीने छान मऊ हटून घ्या. वरून तूप टाकून नैवेद्य दाखवावा.
८. बदामाच्या वड्या
साहित्य:
२ वाट्या बदाम
पाऊण वाटी साखर (अर्धी पण चालेल कमी गोड आवडत असेल तर)
६-७ केशर काड्या
१ चमचा वेलची पावडर
२ चमचे तूप
कृती:
१. एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी घेऊन बदाम १० मिनिटे उकळून घ्या. उकळी आली की बदाम फुगून येतात.
२. गॅस बंद करून उकळलेले पाणी गार होऊ द्या. आता प्रत्येक बदामाचे सालं काढून मिक्सरच्या भांड्यात साखर आणि बदाम बारीक वाटून घ्या. थोडे जाडे भरडे वाटले तरी चालेल. बदाम रात्रभर भिजवून सकाळी सालं काढली तरी चालेल.
३. एका कढईत तूप टाकून मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रण गोळा होईपर्यंत भाजून घ्या. वेलचीपूड आणि केशर घालून छान मिक्स करून घ्या.
४. एका ताटाला तूप लावून भाजलेले मिश्रण छान पसरवून घ्या. गार झाले की वड्या पाडा.
नैवेद्य तयार!!
९. पुरणाचे कडबू
२१ छोटे कडबू
साहित्य:
२ वाट्या तयार पुराण
५ काजूची भरड पुराणात मिसळुन घ्या
३ वाट्या पिठाची मळलेली कणिक
तळण्यासाठी चांगले तूप
कृती:
१. कणकेच्या छोट्या बोटया करुन त्याच्या पाऱ्या लाटून घ्या.
२. एक चमचा पुरण पारित घालुन करंज्यासारखा आकार देऊन कडबू बंद करून घ्या.
३. गरम तुपात कडबू लालसर तळून घ्या.
नैवेद्यासाठी कडबू तयार!!
१०. फ्रुट सलाड
७ जणांसाठी
साहित्य:
४००ग्राम मिल्कमेड
२ वाट्या बारीक कापलेली फळं आपल्या आवडीनुसार
१/४ वाटी कापलेला सुकामेवा
२ वाटी फ़्रेश क्रिम
कृती:
१. मिल्कमेड आणि फ्रेश क्रिम एकत्र करून घ्या.
२. त्यात कापलेली फळे आणि सुकामेवा टाकून छान हलवून घ्या.
३. मिल्कमेड गोड असल्यामुळे साखर टाकण्याची गरज नाही. उपवासाच्या दिवशी हा पदार्थ नैवेद्यासाठी चालतो.
फ्रुट सलाड नैवेद्यासाठी तयार!!