खरवस हे चिकाच्या दुधापासून तयार करतात. चिकाचे दूध म्हणजे गाय किंवा म्हैस व्यालानंतर पहिले ३ दिवस जे दुध येते ते असते.
चिकाचे दूध गवळयाकडे मिळते दूध घेताना कितव्या दिवसाचे आहे ते विचारावे. पहिल्या दिवसाचे असेल तर अर्धे चिकाचे आणि अर्धे साधे दूध हे प्रमाण आहे.
दुसऱ्या दिवसाचे असेल तर साधे दूध चिकाच्या १/२ घ्यावे. तिसऱ्या दिवसाचे असेल तर साधे दूध चिकाच्या १/४ घ्यावे.
पहिल्यांदा करत असाल तर १/४ चिकाचे करून बघा.
खरवस चवीला खूप छान लागते शिवाय चिकाचे दुध पौष्टिक असते त्यामुळे हा एक पौष्टिक पदार्थ आहे. इंग्रजीमध्ये खरवसला steamed pudding म्हणतात. खरवसाचा पोत (texture) चीझ केक किंवा कॅरॅमल कस्टर्ड सारखा असतो पण त्याची पारंपरिक चव ह्या सगळ्या पदार्थांपेक्षा खूप पुढे आहे.
अर्धा किलो खरवस साठी
साहित्य:
१/४ लिटर चिकाचे दूध
१/४ लिटर साधे दूध
१/२ वाटी साखर किंवा आवडीनुसार
१/२ चमचा वेलदोडा पुड
५ केशर काड्या १ चमचा दुधात भिजवून ठेवा
कृती:
१. प्रथम एक मोठ्या भांड्यात साधे आणि चिकाचे दूध एकत्र करा.
२. दुधामध्ये साखर आणि वेलदोडे पूड घालून मिश्रण साखर विरघळेपर्यंत ढवळत राहा.
३. कुकरच्या मोठ्या डब्यात तयार मिश्रण ओता, झाकणाची शिटी काढून ठेवा आणि कुकर मध्ये पाणी घालून जाळीवर डबा ठेवून झाकण लावून ७ मिनिटे वाफेवर मिश्रण शिजवावे.
४. कूकर थंड झाले की शिजलेल्या खरवसाचा डबा फ्रिज मध्ये ठेऊन गार करून घ्यावा.
५.गार झालेल्या मिश्रणाला केसराचे दूध वरून लावावे आणि खरवसाच्या वड्या पाडाव्यात.