हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात. हळद ही बहुगुणी आहे तिचे स्वास्थवर्धक आणि सौदर्यवर्धक असे अनेक फायदे आहेत. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला रंग आणि चव आणण्याव्यतिरीक्त धार्मिक कार्यामध्येही करतात.कच्च्या हळदीचा वापर दोन गोष्टींसाठीच होतो एक लोणच्यासाठी आणि दुसरा दुधात एवढेच मला ठाऊक होते. पण, ह्या हळदीची भाजीही करतात हे जानेवारी महिन्यात राजस्थानला गेल्यावर कळाले. तिथे स्थानिक लोकांच्या घरी हिवाळ्यात ‘हल्दी की सब्जी’ आणि बाजरे की रोटी बनविली जाते. दोनही पदार्थ गरम गुणधर्माचे आहेत जे शरीरात उष्णता निर्माण करतात. ही भाजी भरपूर शुध्द तुपात बनविली जातेे . अतीशय चवदार अशी ही भाजी हिवाळ्यात नक्की करून पहा.
कच्च्या हळदीची भाजी
साहित्य
एक चमचा कच्च्या हळदीचा किस
1 ग्लास दुध
१/२ चमचा आल्याचा किस
१/४ चमचा काळी मिरपूड
१/४ चमचा दालचिनी पूड
१ चमचा तूप
१/२ चमचा साखर
कृती
वरील सर्व साहित्य तूप सोडून ५ मिनिटं उकळून घ्या, वरून एक चमचा तूप टाकून सर्व्ह करा. तुपामुळे हळदीचे सर्व गुणधर्म शरीरात मुरतात.
साहित्य
२०० ग्रॅम ओली हळद (सालं काढून किसणीने किसून, किस मध्यम असावा जास्त बारीक नको आणि जास्त मोठाही नको)
पाऊण वाटी शुद्ध तूप
एक कांदा बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे
१ चमचा लसूण ठेचून
अर्धा चमचा जिरे
चवीपुरतं मीठ
२ चमचे लाल तिखट
१ चमचा गरम मसाला किंवा भाजीचा कोणताही मसाला
एक वाटी दही
अर्धी वाटी मटार दाणे (ऐच्छिक)
कृती
एका मध्यम आकाराच्या कढईत अर्धी वाटी तूप गरम करून हळदीचा किस मऊ होईपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत परतवून घ्यावा. किस सतत हलवावा नाहीतर बुडाला चिकटून करपतो.
हा परतलेला किस एका डिश मध्ये काढून ठेवा. त्याच कढईमध्ये तूप असेल तर त्याच तुपात किंवा २ चमचे तूप टाकून जिरे, लसूण, मिरच्या आणि कांदा परतवून घ्या. कांदा लालसर झाला की मटार टाकून मिश्रण हलवून घ्या आता त्यात लाल तिखट, मीठ, गरम मसाला टाकून परत हलवा. आता परतलेला हळदीचा किस टाकून सगळं एकत्र करून झाकण ठेवून २ मिनिटं वाफ काढून घ्या.
आता त्यात एक वाटी दही टाकून सगळं एकजीव हलवून घ्या. दही टाकलं की भाजी पातळ होते,आणि पाणी सुटते. हे पाणी आटेपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत भाजी छान शिजवून घ्या.
गरम भाजी भाकरी सोबत सर्व्ह करा.
( ही भाजी गार झाली की तुपामुळे घट्ट होते, एक वाटी दही हे प्रमाण सुरुवातीला जास्त वाटते, पण कच्ची हळद उग्र असते एक वाटी दही २०० ग्राम हळदीत सहज समावून जाते. दही एक वाटीपेक्षा जास्त चालेल पण कमी नको, हळदीचा किस परतताना तूप जास्त लागते कमी तुपात ती कढईला चिटकून बसते. मी राजस्थानात खालेल्ल्या भाजीत तूप वाहत होते, ही भाजी पहिली की मला वाटले एवढे तूप का घातले असेल पण भाजी करताना कळाले का घातले असेल)
सध्या कच्च्या हळदीचा सिझन आहे आणि थंडीही आहे तेंव्हा ही भाजी नक्की करून पहा आणि कळवा कशी झाली ते.