आंबा हे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे आवडते फळ आहे. जून महिना सुरु होताच आंब्याचाही मौसम कमी होतो. पण तुम्हाला जर आंबे वर्षभर खायचे असतील तर घरच्याघरी प्रिझर्वेटिव्ह शिवाय आंब्याचा रस टिकू शकतो कसा ते पहा-
१. आंबापोळी
साहित्य- ६ हापूसचे पिकलेले आंबे, साखर
कृती-
आंबे धुऊन पुसून त्याचे देठं काढावीत, त्यानंतर हाताने दाबून हळूहळू आंबे मऊ करावे.
स्टीलच्या पातेल्यात एका-एका आंब्याचा रस काढावा. साल उलटी करून सर्व आंब्याचा रस काढून घ्यावा(पाणी टाकू नये). तसेच कोयांचा (बाठीचा) रस नीट पिळून घ्यावा. १० वाट्या रस असेल तर पावपट म्हणजे अडीच वाट्या साखर घालून तो रस मिक्सरला लावून घ्यावा. मग ताटाला तुपाचा हात लावून त्यात आकाराप्रमाणे दीड ते दोन वाट्या रस पसरावा ताट गोल फिरवून नैसर्गिकपणे रस पसरून घ्यावा व ती ताटे कडक उन्हात उंचावर वाळविण्यास ठेवावीत.
दोन तीन उन्हाने रस सुकतो पोळी थोडी ओलसर असतानाच कडेकडेने सोडवून उलटून टाकावी. पुन्हा उन्हात खडखडीत वाळवून त्याचे सारख्या आकाराचे तुकडे करावेत. पुन्हा ऊन देऊन हवाबंद डब्यात ठेवाव्यात. या पोळ्या वर्षभर टिकतात आणि तुम्ही कधीही आंब्याचा रस, मँगो शेक किंवा अन्य आंब्याचे पदार्थ बनऊ शकता.
२. आंब्याचा मावा
वर दिलेल्या पद्धतीप्रमाणे रस काढून तो जाड बुडाच्या पातेल्यात गॅसवर ठेवावा. स्टीलच्या वा लाकडाच्या उलथन्याने एकसारखा ढवळत राहावा. हळूहळू रस खदखदू लागतो. भांडं मोठं घ्यावं गरम झालेल्या रसाचे थेम्ब बाहेर उडतात. रस दाट झाला म्हणजे त्यात पावपट साखर घालावी. रस साखरेच्या पाकने पातळ होतो. परंतु पुन्हा सुकू लागतो. घट्ट गोळा होईपरेंत मंद उष्णतेवर रस सुकवावा. रस निवळला की त्याचा दाबून घट्ट गोळा करावा. तुपाच्या हाताने गोळा करून साखरेत घोळवा व हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावा.हा रसही काळजीपूर्वक केल्यास वर्षभर उत्तम राहतो व केंव्हाही त्याची बर्फी. मँगो शेक किंवा अन्य आंब्याचे पदार्थ बनविता येतात.